वर्गातील ‘आदित्य’ आणि नायक सरांचा ‘दृष्टिकोन’: एका बदलाची गोष्ट

created on Dec 30, 2025 by Sajitha S.K

शाळा: कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा, (क.डों.म.पा)

शिक्षक: श्री. नायक सर (बदललेले नाव)  (१९ वर्षांचा अनुभव)

वर्गातील फळा, खडू आणि समोर बसलेली मुलं... हे चित्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे, पण शाळेतील नायक सरांच्या वर्गात गेल्यावर हे चित्र थोडे वेगळे दिसते. तिथे केवळ धडे गिरवले जात नाहीत, तर मुलांच्या मनाचा ठाव घेतला जातो. १९ वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असूनही, नायक सर आजही वर्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे एका नव्या विद्यार्थ्याच्या कुतूहलाने पाहतात आणि त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीचा पुरावा म्हणजे इयत्ता तिसरीतील 'आदित्य' (बदललेले नाव) नावाचा विद्यार्थी! 

"हा एका जागी बसतच नाही!" 

ही गोष्ट आहे २०२४ ची. इयत्ता दुसरीच्या वर्गात आदित्य नावाचा एक विद्यार्थी होता. त्याला वर्गात एका जागी बसून लक्ष देणे फार अवघड जायचे. त्याचे मन कधीच स्थिर नसायचे.  तो वर्गात फिरायचा, मित्र-मैत्रिणींच्या खोड्या काढायचा, कधी खिडकीबाहेर तर कधी थेट वर्गाबाहेर पळायचा. त्याच्या आई-वडिलांचे रोजंदारीचे काम आणि घरात हिंदी-मराठी अशा मिश्र भाषेचे वातावरण, यामुळे आदित्यचा शाळेतील शिक्षणाशी मेळ बसत नव्हता.

साहजिकच, पारंपारिक चौकटीतून पाहताना तो एक "खोडकर" आणि "काहीच न येणारा" विद्यार्थी वाटत होता. सुरुवातीला खुद्द नायक सरांनाही प्रश्न पडायचा की, "मी पूर्ण वर्गाला जे शिकवतोय, ते याच्यापर्यंत पोहोचत का नाही?"

शिकवण्याच्या पद्धतीतला 'बदल' 

येथेच नायक सरांच्या अध्यापन प्रवासाला एक वेगळे वळण मिळाले. या शाळेत सजग ट्रस्टचा “शाळा सांगाती” हा उपक्रम चालू आहे. सजगच्या टीममधील सरिता या शाळेच्या समन्वयक आहेत. त्यां वर्गातील वातावरण, शिक्षकांची पद्धत आणि मुलांच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करतात. 

सजगच्या या उपक्रमाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची उत्सुकता आणि आत्मविश्वास जागवणं, आणि शिक्षकांना त्या प्रक्रियेत भागीदार बनवणं. त्यामुळेच थोड्या दिवसांतच सरिता ताईंचे आदित्यकडे लक्ष गेले. ताईंनी ठरवलं की त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचं. त्याच्याबरोबर संवाद साधून आणि त्याचा विश्वास जिंकून  त्याला मदत करायची.

सुरुवातीला त्या रोज केवळ ५ ते १० मिनिटं त्याच्यासोबत बोलायच्या. त्यांनी आदित्यला सहज विचारलं की, “तुला वाचायला, शिकायला आवडेल का?” आणि त्याने लगेच ‘हो’ हे उत्तर दिले. त्याने सरिता ताईंशी मैत्री करायला सुरुवात केली. त्या कधी त्याचं कौतुक करायच्या, कधी त्याला छोटी जबाबदारी द्यायच्या, सगळ्यांसमोर हक्काने सांगायच्या  ‘वर्गातले अमुक काम आदित्य करेल’.  हळूहळू आदित्यचाही दृष्टिकोन बदलायला लागला. तो सरिता ताईंचं ऐकायला लागला. त्याने एका जागी बसून, हळू हळू अभ्यास करण्यास सुरुवात केली, इंग्रजी स्पेलिंग लिहायचा देखील तो प्रयत्न करू लागला.

आदित्यमध्ये होणार बदल नायक सर बारकाईने टिपत होते. सरिता ताईंशी झालेल्या चर्चेतून सरांच्या लक्षात आले की,  कदाचित आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. आदित्यसारख्या मुलांना पुस्तकं आणि फळ्यावरील अक्षरांपेक्षा 'कृती' आणि 'खेळ' जास्त समजतील, हे त्यांनी ओळखले.

                                             

नायक सरांनी आदित्यसाठी आणि त्याच्यासारख्याच इतर मुलांसाठी आपल्या अध्यापन पद्धतीत जाणीवपूर्वक बदल केले:

१. गट पद्धती (Level-wise Grouping): सरांनी हे मान्य केले की वर्गातील प्रत्येक मुलाची समजण्याची गती वेगळी आहे. त्यांनी मुलांच्या स्तरानुसार गट केले. यामुळे 'कोणालाच काही येत नाही' हा शिक्का पुसला गेला आणि 'जो जिथे आहे, तिथून पुढे नेणे' हे ध्येय ठरले.

२. साहित्याचा वापर (TLM over Textbooks): आदित्यला पुस्तकातील अक्षरे रुक्ष वाटत होती. नायक सरांनी 'निपुण भारत' किट आणि विविध शैक्षणिक साहित्याचा (TLM) वापर सुरू केला.

  • अक्षरांसाठी: प्लॅस्टिकची अक्षरे (Cut-outs) हाताळायला दिली.
  • गणितासाठी: गोट्या, मणी आणि ॲबॅकसचा वापर केला. ३ अधिक १ किती? हे फळ्यावर मांडण्यापेक्षा सरांनी ३ गोट्यांमध्ये १ गोटी मिसळून दाखवली. हाताला स्पर्श झाल्यावर डोक्याला गणित समजले!

३. हवामान तक्ता आणि गाणी: केवळ अभ्यासच नाही, तर वर्गातील वातावरणातही बदल केला. 'हवामान तक्त्या' मुळे मुलांना वार आणि तारीख याची गंमत वाटू लागली. गाण्यांच्या माध्यमातून शब्दांची ओळख करून दिली. यामुळे मुले कंटाळण्याऐवजी प्रक्रियेत गुंतून राहू लागली.

परिणाम: आत्मविश्वास आणि सहकार्य 

ज्या आदित्यला "काहीच येत नाही" असे वाटत होते, तो आता स्वतःहून अक्षरे जुळवू लागला. 'पियर लर्निंग' (Peer Learning) किंवा सहाध्यायी शिक्षणाचा वापर सरांनी केला. मुले एकमेकांना मदत करू लागली. आदित्यला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो आता घाबरून गप्प बसत नाही, तर नायक सरांकडे जाऊन हक्काने विचारतो, "सर, हे कसं करायचं?"

आज आदित्य तिसरीत आहे. तो केवळ वाचायला-लिहायलाच शिकला नाही, तर त्याचा गणितातील रसही वाढला आहे. पण सर्वात मोठा सकारात्मक बदल  हा आहे की, शाळेबद्दलची त्याची भीती जाऊन तिथे 'गोडी' निर्माण झाली आहे.

नायक सर म्हणतात, "मुलांमध्ये गट केल्यावर आपल्याला खूप सावध राहावं लागतं, जेणेकरून त्यांच्यात न्यूनगंड येणार नाही. पण जेव्हा आपण त्यांना त्यांच्या गतीने शिकू देतो, तेव्हा ती मुले आश्चर्यकारक प्रगती करतात. आदित्यला बघून मला हे समाधान मिळतं की, आपण थोडासा दृष्टिकोन बदलला तर मुलाचं भविष्य बदलू शकतं."

आदित्यची ही गोष्ट केवळ एका मुलाची नाही. प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत असे अनेक 'आदित्य' असतात, जे केवळ योग्य पद्धतीची आणि आधाराची वाट पाहत असतात. नायक सरांनी हे सिद्ध केले आहे की, मुलांमधील बदल हा शिक्षकाने स्वतःच्या अध्यापन पद्धतीत केलेल्या छोट्याशा, मानवी आणि आनंददायी बदलांमधूनच सुरू होतो.

सजग बद्दल 

नायक सर आणि  आदित्यची ही गोष्ट म्हणजे सजग ट्रस्टच्या कामाचं जिवंत उदाहरण आहे. २०१६ मध्ये कल्याणमध्ये सुरू झालेली हि संस्था आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५५ शाळा, १५०० मुले, आणि ५० पालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे.

“शाळा सांगाती”, “एनरीड”, “रीड अलाउड” आणि “विद्यासदन” अशा उपक्रमांद्वारे सजगतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते, खेळातून शिकवणीसाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाते आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत दुप्पट वाढ झाल्याचं मूल्यांकनात दिसून आलं आहे.